जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या उघड्यावर मांसविक्रीच्या प्रकारांवर आक्षेप घेत हिंदू जनजागृती समितीने जळगाव महानगरपालिकेच्या महापौर सौ दीपमाला मनोज काळे ह्यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. शहरातील मुख्य रस्ते व नागरी वस्त्यांमध्ये नियमबाह्य पद्धतीने मांसविक्री होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

समितीच्या म्हणण्यानुसार, उघड्यावर टाकण्यात येणारे मांसाचे अवशेष व हाडे यामुळे भटकी कुत्री आकर्षित होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे. तसेच या प्रकारामुळे स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याचे प्रश्नही गंभीर बनत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय मांसविक्रीसाठी आवश्यक परवाने, स्वच्छतेचे निकष आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत संबंधित विक्रेत्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे.
महानगरपालिकेने या निवेदनाची दखल घेत संबंधित विभागामार्फत तपास करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

