भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ शहरातील एका २० वर्षीय तरुणीवर ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर बळजबरीने धर्मपरिवर्तन करून मुस्लिम रीतीरिवाजांनुसार तिचा निकाह लावण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पीडित तरुणीला तब्बल आठ दिवस एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. या काळात तिच्यावर बुर्खा घालण्यासाठी, नमाज पठण करण्यासाठी तसेच मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे
जिवे मारण्याची धमकी
८ मार्च रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास आरोपीने तरुणीला दुचाकीवरून मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दीपनगर येथे नेले. दुसऱ्या दिवशी तिला एका अज्ञात खोलीत नेण्यात आले. तेथे उपस्थित असलेल्या एका मौलानाने तरुणीला कलमा पठण करण्यास सांगितले. तिने नकार दिल्यावर, “कलमा म्हण, नाहीतर तुला जिवे मारून टाकू,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
प्राणभयामुळे तरुणीने कलमा पठण केले. त्यानंतर तिचे धर्मपरिवर्तन करून मुस्लिम पद्धतीने निकाह लावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आठ दिवस डांबून ठेवून अत्याचार
निकाह झाल्यानंतर पीडितेला मध्य प्रदेशातील सुंदरनगर परिसरातील एका खोलीत नेण्यात आले. तेथे तिला आठ दिवस बंदिस्त ठेवून बुर्खा घालणे, नमाज पठण करणे आणि मुस्लिम धर्म स्वीकारणे यासाठी दबाव टाकण्यात आला. विरोध केल्यास अमानुष मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल
या संपूर्ण घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. सुरुवातीला मध्य प्रदेशातील सिवनी मालवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासासाठी हा गुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे.

