बोरखेडा हत्याकांड : चार निष्पाप बालकांच्या हत्येप्रकरणी आरोपी महेंद्र बारेला याला फाशीची शिक्षा

रावेर | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बोरखेडा हत्याकांड प्रकरणात आज महत्त्वपूर्ण निकाल देत न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला यास फाशीची शिक्षा सुनावली. रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्येप्रकरणी फास्टट्रॅक न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

या खटल्यात राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. न्यायालयासमोर एकूण 23 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील निष्कर्षांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.

बोरखेडा हत्याकांडानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. चार निष्पाप बालकांच्या हत्येमुळे समाजमन हादरले होते. या प्रकरणातील निकालाकडे नागरिक, सामाजिक संघटना आणि पीडित कुटुंबीयांचे विशेष लक्ष लागले होते.
आज न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे पीडित कुटुंबीयांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, राज्यभरातून या निकालाचे स्वागत करण्यात येत आहे. हा निकाल जळगाव जिल्ह्यातील तसेच राज्यातील सर्वात चर्चित गुन्हेगारी प्रकरणांपैकी एक म्हणून नोंदला जात आहे.