राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात : पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

वरणगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील वरणगाव शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर गुरुवारी (दि. 5 जून) दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या कुटुंबाला एमएच-19-ईव्ही-5353 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात दुचाकीवरील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


मृतांमध्ये विजय शंकर काळे (20), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (30), विघ्नेश शंकर चव्हाण (14) आणि मोनालिसा शिवबसप्पा भोसले (1) यांचा समावेश आहे. सर्व मृतक मलकापूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, अपघातानंतर स्कॉर्पिओ वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहनाचा वेग आणि निष्काळजीपणा यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या हृदयद्रावक घटनेमुळे वरणगाव व परिसरात शोक व्यक्त केला जात असून महामार्गावरील सुरक्षित वाहनचालना आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.अपघाताच्या कारणाबाबत पोलीस तपास सुरू असून अंतिम निष्कर्ष तपास अहवालानंतरच स्पष्ट होईल.)