भुसावळात कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्याचा मृत्यू; नागरिकांचा नगरपरिषद प्रशासनावर व कुत्रा मालकावर संताप.. माजोरडा कुत्रा मालक उलट देतोय मृत मुलाच्या परिचितांना जातीवाचक शिव्या.. रहिवाशांचे गंभीर आरोप

बातमी:
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नारायण नगर परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ९ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरभर हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नगरपरिषद प्रशासनाच्या कामकाजावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
माहितीनुसार, तारकेश विशाल झोपे (वय ९) हा विद्यार्थी २४ एप्रिल रोजी सकाळी शाळेत जात असताना नारायण नगर भागात एका कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर व नाकावर गंभीर दुखापत झाली होती. जखमा गंभीर असल्याने त्याच्या चेहऱ्यावर सुमारे ८० टाके घालावे लागले होते.
घटनेनंतर मुलावर जळगाव येथील शिल्पा हॉस्पिटलमध्ये डॉ. श्रीराज महाजन यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचार व प्लास्टिक सर्जरीसाठी त्याला मुंबई येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. या घटनेमुळे झोपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, भुसावळ शहरातील भिरूड कॉलनी, नारायण नगर, रिंग रोड, म्हाडा कॉलनी, गणेश कॉलनी तसेच इतर भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहेत. अनेक वेळा कुत्र्यांचे टोळके नागरिकांच्या मागे धावत असल्याने महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार धास्तावले आहेत.
शहरातील अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग आणि दुर्लक्षित भागांमुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासन प्रभावी उपाययोजना करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या प्रकरणात संबंधित हल्ला हा नारायण नगर परिसरातील प्रकाश कोळी उर्फ खन्ना यांच्या पाळीव कुत्र्याने केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी करणाऱ्या महिलांशी अशोभनीय भाषा वापरल्याचा व जातीवाचक शिवीगाळ चाही आरोप करण्यात आला आहे. हा मुद्दा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डमाळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.
घटनेनंतर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई करत दीपक बारसे व त्यांच्या पथकाने प्रकाश कोळी यांच्या घरातून पाच कुत्री ताब्यात घेतली. या कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, शहरातील आक्रमक मोकाट कुत्र्यांवर तातडीने नियंत्रण आणावे, नियमित नसबंदी मोहीम राबवावी, स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशा मागण्या नागरिकांकडून करण्यात येत आहेत.मोठ्या संख्येने नागरिक आरोपीच्या घरासमोर व शहर पोलिस स्टेशन येथे ठिय्या करून होते. अद्यापही आरोपीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही .